बसथांबा नसल्याने प्रवाशांचे हाल; आठ दिवसांत बसथांबा बसवावा   

पुणे : गणेशखिंड रोड येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सीमाभिंतीलगतचा बसथांबा पुणे मेट्रोच्या कामामुळे अनेक दिवसांपूर्वी हटवण्यात आला होता. मात्र, अद्याप तो पुन्हा बसवण्यात आलेला नाही. यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या परिसरात शाळा, महाविद्यालये, विविध सरकारी व खाजगी कार्यालये तसेच निवासी संकुले मोठ्या प्रमाणात आहेत. येथेून पुणे शहर व उपनगरांमध्ये जाण्यासाठी पीएमपीएमएलच्या अनेक बस जात असल्या तरी बसथांबा नसल्याने प्रवाशांना उन्हात, रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून, अनेकजण दुचाकीस्वार किंवा मोठ्या वाहनांमुळे जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
 
या पार्श्वभूमीवर मनसेने पुणे महापालिका आयुक्त, सहाय्यक आयुक्त (घोले रोड-शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय) यांना निवेदन दिले असून, खासदार मुरलीधर मोहोळ व आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना नोंदणीकृत पोस्टने निवेदन पाठवले आहे. जर येत्या आठ दिवसांत बसथांबा बसवला गेला नाही, तर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल आणि होणार्‍या नुकसानीस प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
 
यावेळी मनसे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास भगवानराव निम्हण, उपविभागाध्यक्ष संजय तोडमल, गोकुळ अडागळे, शाखाध्यक्ष मिलन भोरडे, उमेश येवलेकर, आयुष बोबडे, वाहतूक विभागाध्यक्ष योगेश शिंदे, किशोर इंगवले तसेच इतर मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles